हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चाही झाली होती. त्या चर्चेनंतर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो, असं कबुल केलं होतं. मात्र मुंबईला आल्यांनतर त्यांनी शब्द फिरवला असा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना केसरकर म्हणाले, स्वत: उद्धव ठाकरे भाजपाशी हातमिळवणी करण्यासाठी प्रयत्न करत होते. युतीपासून लांब जाणं त्यांना स्वतः आवडलं नव्हतं. त्यावेळी मोदी त्यांना भेट देत नव्हते. तरीही आम्ही त्यांची भेट घडवून आणली. उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांशी बोलणी झाली. उद्धव ठाकरेंनी कबूल केलं की, घडलेलं चुकीचं आहे. हे सुधारलं गेलं पाहिजे. तसेच, भाजपाबरोबर जाण्यासाठी उद्धव ठाकरेंनी वचन दिलं होतं मात्र नंतर त्यांनी शब्द फिरवला असं केसरकर म्हणाले.
एवढंच नव्हे तर आम्ही तुम्हालाच मुख्यमंत्री करू पण तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा असं एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं होत ते सुद्धा त्यांनी ऐकलं नाही. आम्ही गुवाहटीला गेल्यानंतर मी त्यांना बोललो होतो की, अजूनही तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा, आम्ही मुंबईला येऊ. पण तेव्हाही उद्धव ठाकरेंनी आमचं ऐकलं नाही असं दीपक केसरकर यांनी सांगितलं