हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद उभा राहिला असल्याने यावरून विरोधकांनी राज्य सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावरून शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “आजच्या घडीला जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी सत्तेला लाथ मारून ते बेळगावच्या नागरिकांबरोबर राहिले असते,”असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ज्या प्रमाणे विरोधकांकडून राज्य सरकारला विरोध करत आहेत. त्यावरून ते महाराष्ट्राबरोबर नसून ते कर्नाटकाच्या बाजूने बोलत आहेत असं दिसून येत आहे. राज्यात असलेल्या विरोधी बाकावरच्या मंडळींना प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे हाच त्यांचा गुणधर्म आहे.
सीमाभागातील नागरिकांना शिंदे सरकारने मदत केली आहे. त्याचबरोबर त्यांना सोयीही दिल्या आहेत. त्यामुळे कर्नाटक सरकारच्या पोटात दुखतं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटकात प्रवेश नाकारला जात आहे. सीमावादावर न्यायालयामध्ये आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. त्याबरोबरच देवेंद्र फडणवीसही प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हा प्रश्न सोडवणे आमच्यासाठी महत्वाचे आहे. सीमावाद सोडवायचा असल्यानेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत. मात्र विरोधक फक्त या गोष्टीचे राजकारण करत असल्याचेही केसरकर यांनी म्हंटले.