हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात 2019 ला काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाआघाडी स्थापन झाल्यानंतरही भाजपसोबत युतीबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र, नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर सुशांत सिंह रजपूत प्रकरणी गंभीर आरोप केले आणि उद्धव ठाकरे नाराज झाले. त्यामुळे ही युती पुढे होऊ शकली नाही, असा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी केला.
दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेत युती न होण्याचा ठपका नारायण राणेंवर ठेवला. आदित्य ठाकरेंवर टीका केल्यानंतर मातोश्रीवर प्रेम करणारे दुखावले होते. ज्या व्यक्तीला मोठं राजकीय भवितव्य आहे, अशा घरातील तरुणाची बदनामी होते, तेव्हा साहजिकच राग येतो. त्यामुळे हे प्रकरण आम्ही केंद्रात नेलं. मी स्वतः या गोष्टी पंतप्रधान मोदींच्या कानावर घातल्या. मोदींनीही चांगला रिस्पॉन्स दिला , ठाकरे घराण्याबद्दल प्रेम आणि आदर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली, असे केसरकर म्हणाले.
यानंतर उद्धव ठाकरे मुखयमंत्रीपदाचा राजीनामा देणार होते. पण याच काळात महाविकास आघाडीने भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन केल्याने भाजप नाराज झाली तर दुसरीकडे नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यामुळे उद्धव ठाकरेही नाराज झाले आणि संबंध बिघडले, असे केसरकर यांनी म्हंटले.