कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
देशात यापूर्वी झालेल्या विविध निवडणुकांमध्ये सोईनूसार अन्य पक्षांच्या आघाडीसोबत जाऊन निवडणुका होत होत्या, अनेक वेळेला उमेदवारांना माघार घ्यावी लागत असे. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्याला निवडणूक लढता येत नव्हती. मात्र आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने येणार्या निवडणुकात सर्व जाती धर्मातील घटकांना व त्यांच्या स्थानिक प्रश्नांना घेऊन निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आंबेडकर) राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांनी आज कराड येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, सातारा जिल्हा अध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, कराड दक्षिण तालुका अध्यक्ष मुकुंद माने, कराड उत्तरचे अध्यक्ष सर्जेराव बनसोडे, तसेच सातारा तालुका अध्यक्ष दिपक गाडे उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओहाळ म्हणाले, राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला बळकटी देण्यासह नव्या-जुन्या कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली ‘संवाद भाऊंशी; संवाद जनतेशी’ अभियान सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार संपूर्ण राज्यात जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यात येत आहेत. नुकताच शनिवारी सातारा येथे रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.