औरंगाबाद – जालना औरंगाबाद महामार्गावरील करमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीसमोर चक्कर येऊन कोसळलेल्या युगुलाने एकमेकांना मिठीत घेत जीव सोडला. वर्दळीच्या जालना रोडवर काल सायंकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली. दोघे मृत युगुल नात्याने दिर भावजय असल्याचे समोर आले आहे. दोघेही मृत हे बदनापूर तालुक्यातील असून, काकासाहेब बबन कदम (32) व सत्यभामा अशोक कदम (27) अशी मृतांची नावे आहेत.
करमाडच्या कृषी उत्पन्न बाजार समिती समोर काल सायंकाळी जालना रोडने झोकांड्या खात एक पुरुष व महिला येत असताना लोकांनी पाहिले. काही क्षणात त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली व ते रस्त्यावर कोसळले. त्यांना वांत्या ही होत होत्या. त्यांनी ही माहिती त्वरित पोलिसांना कळवली तोपर्यंत ते जोडपे रस्त्यावर हात-पाय खोडत तडफडत होते. त्यांचा मोबाईलही बाजूलाच पडलेला होता. पोलिसांनी मोबाईल वरून शोध घेत त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली. 108 रुग्णवाहिकेतून दोघांना चिकलठाणा येथील मिनी घाटीत पाठवण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले.
पोलिसांनी सांगितले की, जालना जिल्ह्यातील ही महिला तिच्या बहिणीसह बेपत्ता असल्याची तक्रार करणार पोलीस ठाण्यात आठ दिवसांपूर्वी दाखल करण्यात आली होती. सत्यभामा कदम या गोलटगाव येथील बहिणीकडे मुलाच्या वाढदिवसासाठी आल्या होत्या. तेव्हा पासून दोघी बहिणी बेपत्ता झाल्या होत्या. तिचा शोध लावण्यात करमाड पोलिसांना दोन दिवसांपूर्वी यश आले. तेव्हापासून करमाड पोलीस सत्यभामा यांचा शोध घेत होते. सत्यभामा कदम यांचे चुलत दीर काकासाहेब याच्या सोबत प्रेम संबंध असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. बघ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार विषारी द्रव्य प्राशन केल्यानंतर त्यांनी एकमेकांना मिठी मारली व त्याच अवस्थेत ते पडून होते. उलट्या झाल्यानंतर त्यांना झटके येत होते उलट्या झाल्या नंतर ते विषारी दर्प पसरला होता. करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विजयसिंग जारवाल यांनी करमाड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला संपर्क केला. त्यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी आल्यानंतर दोघांना चिकलठाणा येथील मिनी घाटीत उपचारांसाठी दाखल केले.




