हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहखात्याची जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यान गृहखात्याची जबाबदारी मिळाल्यानंतर दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर पोहोचले होते. यावेळी इतर नेतेही उपस्थित होते. या बैठकीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी काही वेळापूर्वीच संवाद साधला.
सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत दिलीप वळसे पाटील यांनीहि हजेरी लावली होती. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “जबाबदारी मोठी आहे आणि ती पार पाडण्यास मला निश्चित आवडेल. मी दुपारी १.३० वाजल्यानतंर मंत्रालयात येऊन पदभार स्वीकारणार आहे”.
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना नुकतेच दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफव राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे. हे पत्र राज्यपालांनी स्वीकारले असून त्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे वळसे पाटील यांच्या गृहमंत्री पदावर शिक्कामोर्तब झाले आहे.
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांचे विश्वासू दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपदाचा कारभार देण्यात येत असून त्यांच्या निवडीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे नुकतेच पत्र दिले आहे. उद्या दिलीप वळसे-पाटील तातडीने या खात्याची सूत्रे हाती घेणार आहेत. सुरुवातीला अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहखाते काही काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राहील, असे म्हटले जात होते. मात्र, गृहखात्यासारखे संवेदनशील आणि सामर्थ्यशाली खाते राष्ट्रवादी इतर कोणाच्याही ताब्यात द्यायला तयार नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीकडून तातडीने अनिल देशमुख यांचा उत्तराधिकारी कोण, हे ठरवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या.
दुसरीकडे शरद पवार यांचे आणखी एक विश्वासू सहकारी हसन मुश्रीफ यांचे नावही गृहमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा होती. त्यासाठी हसन मुश्रीफ तातडीने मुंबईला रवाना झाल्याचेही सांगितले जात होते. मात्र, आता त्यांचा विचार गृहमंत्री नव्हे तर कामगार मंत्रालयासाठी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. हे खाते पूर्वी दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे होते. तर दिलीप वळसे-पाटील यांच्याकडील उत्पादन शुल्क खात्याचा कारभार हा अजित पवार स्वीकारनार आहेत.