नवी दिल्ली । मोदी सरकाराच्या कृषी कायद्याविरोधात कोरोना संक्रमण काळातही गेल्या तीन आठवड्यांपासून शेतकरी राजधानीच्या सीमेवर ठाण मांडून बसलाय. परंतु, इतके दिवस आंदोलन सुरु असताना मोदी सरकार ढिम्म असून कुठलाही तोडगा काढण्याची त्यांची तयारी दिसत नाही आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलनाचा २१ वा दिवस उजाडला असून दिल्लीतील पारा तब्बल ४ अंशावर आल्यावर अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. मात्र, असंख्य अडचणी आणि गोठवणाऱ्या कडाक्याच्या थंडीतही शेतकरी कृषी कायदे मागे घेण्याच्या आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
दिल्ली बॉर्डरवर शेतकऱ्यांमध्ये मोठ्या संख्येत वयोवृद्ध शेतकरी आहेत. याशिवाय महिलांची संख्याही मोठी आहे. अनके शेतकरी परिवारही आंदोलनात सामील झाले आहेत. त्यांच्यासोबत लहान मुलंसुद्धा आहेत. त्यामुळं दिल्लीतील घसरत पारा यासर्वांसाठी जीवघेणा ठरू शकतो. मात्र, यासर्वातही शेतकरी खंबीर उभे आहेत.
दरम्यान, उत्तर भारतात पारा कमालीचा घसरलेला दिसून येतोय. डोंगराळ भाग बर्फानं आच्छादून गेलेला दिसत असतानाच सपाट राज्यांतही कापरं भरायला लावणारी थंडी पसरलीय. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, १६ डिसेंबर रोजी दिल्लीतील पारा ४ अंशापर्यंत खाली पोहचला. दिल्ली – एनसीआर आणि उत्तर भारतात थंडीचा प्रभाव वाढताना दिसतोय. हवामान विभागाच्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीचं तापमान आज (बुधवार) जास्तीत जास्त १८ अंशापर्यंत राहू शकेल.
Delhi: Fog continues to shroud the national capital
The maximum and minimum temperatures expected to be 18 and 4 degrees Celsius, respectively
(Data source: India Meteorological Department) pic.twitter.com/DPf7VLTPMu
— ANI (@ANI) December 16, 2020
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या दोन तीन दिवसांत उत्तर भारताच्या तापमानात तीन डिग्रीपर्यंत घट होऊ शकते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीचं तापमान २ अंश सेल्सिअसपेक्षाही खाली घसरण्याचा अंदाज हवामान विभागानं आधीही व्यक्त केला होता. दिल्लीशिवाय पंजाबमध्ये थंडी नागरिकांचं जनजीवन विस्कळीत करतेय.
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या उंचावरच्या भागांत अनेक ठिकाणी बर्फवृष्टी सुरू आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, डोंगराळ भागात येत्या काही दिवसांत पारा आणखीन खाली घसरण्याची शक्यता आहे. तर, पंजाब, हरयाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील पारा येत्या काही दिवसांत आणखीन घसरू शकतो. दुसरीकडे, मुंबईसहीत महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आलीय. याशिवाय पुदुच्चेरी, केरळ आणि तामिळनाडूमध्येही १७-१८ डिसेंबर रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात पारा घसरल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’