येत्या ४ महिन्यात अनेक आमदार महाविकास आघाडीत येणार; अजितदादांचा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । तीन पक्षाचे सरकार स्थापन झाल्यामुळे तुमचा हातातोंडाशी आलेला घास गेला. हे सरकार सहा महिन्यात जाईल, असे भविष्य आपण सांगत होतात. मात्र नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुशिक्षित, पदवीधर मतदार यांनीही भाजपला नाकारले असे सांगून, येत्या चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. मी आधीच का सांगितले नाही, असे म्हणू नका असेही ते म्हणाले.

पुरवणी मागण्यांच्या अनुषंगाने ते विधानसभेत बोलत होते. विधान परिषदेत नागपूरमध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती, ती जागा भाजपने गमावली. त्याचा एका गटाला प्रचंड आनंद झाला, मात्र दुसरा गट अस्वस्थ झाला, असे सांगून पवार म्हणाले, पुण्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाच पराभव झाला. धुळे-नंदुरबारमध्ये अमरीश पटेल जरी निवडून आले असले तरी, ते आमच्याकडूनच तिकडे गेलेले आहेत. ते कधी परत येतील, हे कळणार नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला.

माझ्याविरुद्ध लढून दाखवा! – अजित पवार
‘माझ्या भाषणात जो अडथळे आणतो तो पुढल्या वेळी निवडून येत नाही,’ असे मिश्कील विधान भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “चला, मी घेतले चॅलेंज. पुढच्या निवडणुकीत मला हरवून दाखवा.” यावर मुनगंटीवार निरुत्तर झाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment