हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील निर्भयाच्या चारही दोषींना शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता तिहार तुरूंगात फाशी देण्यात आली. दोषींना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून निर्भयाची आई गेली सात वर्षे सातत्याने कोर्टात भांडत होती. दोषींना फाशी मिळावी म्ह्णून त्यांनी न्यायालयीन लढाई लढली. या लढाईला अखेर यश येत ७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवावे लागले. फाशी देण्यापूर्वी दोषींनी फाशीची शिक्षा टाळण्यासाठी सर्व कायदेशीर पर्याय वापरले, परंतु अखेर निर्भयाला न्याय मिळाला. दरम्यान, आज सकाळी जेव्हा दोषींना शेवटची इच्छा विचारली असता चारही गुन्हेगारांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. शेवटच्या क्षणी देवाची प्रार्थना किंवा पूजा करण्यासाठी काही हवं आहे अशीही विचारणा तरुंग प्रशासनाने केली मात्र,दोषींनी सुरुवातीला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. निर्भयाच्या चार दोषींपैकी एक विनय हंबरडा फोडत रडू लागला तर उर्वरित तीन दोषी पवन, मुकेश आणि अक्षय शांत राहिले
दरम्यान, दोषी मुकेशने मृत्यूनंतर आपले अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर विनयने त्याने बनविलेले एक पेंटिंग त्याच्या घरच्यांना देण्यास सांगितलं. फाशीच्या आदल्या रात्री मुकेश-विनयने जेवण केले, खिचडी खाल्ली. पवन आणि अक्षय रात्रभर अस्वस्थ राहिले. रात्रभर चारही दोषी झोपले नव्हते. तसेच कोर्टाकडून काही नवीन आदेश आले आहेत का अशी सतत विचारणा ते पोलिसांना रात्रभर करत होते. चारही दोषींनी सकाळी चहा पिण्यास नकार दिला. मला मरायचे नाही आहे असं म्हणत फाशी देण्यापूर्वी विनय पोलिसांना विनवणी करत होता, “मला क्षमा करा … मला मारायचे नाही.” असं म्हणत विनयने जमिनीवर लोटांगण घातले.
जेव्हा दोषींना आंघोळ करायला आणि कपडे बदलायला सांगण्यात आले तेव्हा दोषी विनयने कपडे बदलण्यास नकार दिला. तो शेवटपर्यत रडत राहिला क्षमा मागू लागला. सकाळी फाशी देण्यापूर्वी कैद्याला नवीन कपडे दिले जातात. विनयने नवीन कुर्ता-पायजामा घालण्यास नकार दिला.
दिनांक १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत सामूहिक बलात्कार आणि एका महिलेच्या हत्येच्या प्रकरणात या चार दोषींना शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता फाशी देण्यात आली. जेलचे महासंचालक संदीप गोयल यांनी ही माहिती दिली. संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या बलात्कार आणि अमानुष हत्या प्रकरणातील चार दोषी मुकेशसिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय कुमार सिंग यांना पहाटे पहाटे साडेपाच वाजता तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली. दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या तिहार जेलच्या परिसरात पहिल्यांदाच एकाच वेळी चार दोषींना फाशी देण्यात आली.
फाशीची शिक्षा होऊ नये म्हणून या चारही दोषींनी त्यांच्या सर्व कायदेशीर पर्यायांचा पुरेपूर वापर केला आणि गुरुवारी रात्रीपर्यंत या खटल्याची सुनावणी कोर्टात झाली. सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात या दोषींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर, शिक्षेच्या अंमलबजावणीची तारीख तीन वेळा निश्चित करण्यात आली होती. मात्र, तीन वेळा फाशी पुढे ढकलण्यात आली. अखेर आज सकाळी चारही दोषींना फाशी देण्यात आली.
ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.
कोरोनासंबंधीच्या या बातम्याही वाचा –
करोनाविरुद्धच्या लढाईत बॉलीवूडकर आले समोर; पहा व्हिडिओ..
कोरोनाच्या संकटात माणुसकी सोडू नका – मुख्यमंत्री ठाकरे
जीवनावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये बंद राहणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
व्हिडिओ: ऐका हो! करोना पोवाडा..कोल्हापूरच्या शाहिराचा अनोखा जनजागृती पोवाडा
लोकलच्या गर्दीत केवळ ३० टक्के घट; लोकल बंद करण्याचा आरोग्यमंत्र्यांनी दिला कडक इशारा