नवी दिल्ली । दिल्ली पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात उत्तर-पूर्व दिल्लीत उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात आपली चार्जशीट दाखल केली आहे. कमालीची बाब म्हणजे, या चार्जशीटमध्ये एका डॉक्टरच्या नावाचा समावेश दिल्ली पोलिसांनी केला आहे. दिल्ली पोलिसांनी अल हिंद रुग्णालयाचे मालक असलेले डॉ. एम. ए अनवर यांच्यावर दंगलीसाठी लोकांना भडकावण्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, चार्जशीटमध्ये आपलं नाव पाहिल्यानंतर डॉ. अनवर यांनाही धक्का बसला आहे. ‘माझं नाव का?’ असा सवाल करत दिल्ली हिंसाचारात आपण अनेक लोकांचा जीव वाचवला होता, असं अनवर यांनी म्हटलं आहे.
दिल्ली पोलिसांच्या चार्जशीटमध्ये दिलबर नेगी (२० वर्ष) याच्या हत्या प्रकरणात डॉ. अनवर यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. दिलबर नेगी एका रेस्टॉरन्टमध्ये काम करत होता. दिल्ली दंगलीदरम्यान जमावाकडून दिलबर नेगी याची हत्या करण्यात आली होती. डॉ. अनवर यांच्यावर नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत सीएए आणि एनआरसी विरोधी आंदोलनाचं नेतृत्व करणं आणि लोकांना दंगलीसाठी भडकावण्याचा आरोप दिल्ली पोलिसांकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, दिल्लीत उसळलेल्या दिल्ली हिंसाचारानंतर डॉ. अनवर आणि त्यांचा भाऊ डॉक्टर मेराज इकराम यांनी जवळपास ५०० जणांवर मोफत उपचार केले होते. इतकंच नाही तर डॉ. अनवर, त्यांचा भाऊ आणि २ नर्स यांनी कर्फ्युतही लोकांना मोफत औषधं आणि मेडिकल सेवा दिली होती. ज्या रुग्णांना गरज होती त्यांना इतर रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली होती.
दिल्ली हिंसाचारप्रकरणात आपलं नाव आल्यावर डॉ. अनवर यांनी म्हटलं कि, ‘मी कधीही कोणत्याही आंदोलनात सहभागी झालो नव्हतो. मी एक डॉक्टर आहे आणि लोकांवर उपचार करणं, त्यांचा जीव वाचवणं हे माझं काम आहे… आणि तेच मी केलं’ असं म्हणत डॉ. अनवर यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावत चार्जशीटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. आंदोलकांमुळे या भागात येण्या-जाण्यासाठी लोकांना त्रास होत होता, त्यामुळे हे आंदोलन थांबवण्याची मी स्थानिक पोलिसांना विनंती केली होती, असंही डॉ. अनवर यांचं म्हणणं आहे.
दिल्ली हिंसाचारात तब्बल ५१ जणांनी आपले प्राण गमावले होते. ‘फारुकिया मशिदीत झालेल्या विरोध प्रदर्शनाचे आयोजक अरशद प्रधान आणि अल हिंद रुग्णालयाचा मालक डॉ. अनवर होते. या लोकांची चौकशी केली जाऊ शकलेली नाही. त्यांची नंतर चौकशी करण्यात येईल’ असंही दिल्ली पोलिसांच्या चार्जशीटमध्ये म्हटलं गेलं आहे. पोलिसांनी आपल्या चार्जशीटमध्ये १२ जणांना आरोपी बनवलंय. हे सर्व जण न्यायालयीन कोठडीत आहेत. मोहम्मद शानवाज उर्फ शानू, मोहम्मद फैजल, आझाद, अशरफ अली, राशिद उर्फ मोनू, शाहरुख, मोहम्मद शोएब, परवेज, राशिद उर्फ राजा, मोहम्मद ताहिर, सलमान आणि सोनू सैफी अशी या आरोपींची नावं आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”