सांगली । जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील देवराष्टे येथील दत्तात्रय लोहार यांनी एक भन्नाट चारचाकी गाडी बनवली आहे. भंगार आणि दुचाकीच्या भागांपासून बनवलेल्या या कारच्या प्रयोगाच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला. त्यानंतर लोहार यांनी बनवलेल्या या कारची दखल चक्क महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी घेतली.
त्यांनंतर, आता राज्याचे मंत्री आणि स्थानिक आमदार विश्वजीत कदम यांनीही या जुगाड जिप्सीची दखल घेत दत्तात्रय लोहार यांचं कौतुक केलंय. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी, माझ्या मतदारसंघातील देवराष्ट्रे या गावच्या दत्तात्रय लोहार यांनी उपक्रमशीलतेतून बनवलेल्या चार चाकी गाडीबद्दल मी कौतुक करतो. त्यासाठीचा ६० ते ७० हजाराचा खर्च मी माझ्या ट्रस्टच्या माध्यमातून देत असल्याचे जाहीर करतो, असे ट्विट विश्वजीत कदम यांनी केलं आहे.
तसेच, उद्योजक आनंद महिंद्रा यांनी बोलेरो कार भेट देऊन केलेल्या सन्मानाबद्दही विश्वजीत कदम यांनी त्यांचे आभार मानले आहेत. त्यामुळे, आता दत्तात्रय लोहार यांना आनंद महिंद्रा यांच्याकडून नवी कोरी बोलेरो कार मिळणार आहेच, त्यासोबत आता त्यांनी बनविलेल्या जुगाड जिप्सीसाठीचा खर्च झालेला संपूर्ण पैसाही त्यांना परत मिळणार आहे.