मुंबई । कोरोना व्हायरसचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी राज्यभरात महाराष्ट्र बचाव आंदोलन केलं. भाजपच्या या आंदोलनावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. भाजप नेत्यांनी आंदोलन करण्यापेक्षा केंद्र सरकारकडे पीपीई किट आणि टेस्टिंग किटची मागणी केली पाहिजे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
कोरोनाच्या काळात केंद्र सरकारकडून पीपीई किट्स, टेस्टिंग किट्स आणि औषधं यायला हवीत, पण मागणीच्या ३० टक्केही पुरवठा होत नाही. खरंतर आपल्या विरोधी पक्षनेत्यांनी केंद्रात गेलं पाहिजे आणि आम्हाला पीपीई किट्स, टेस्टिंग किट्स द्या, अशी मागणी केली पाहिजे. आमच्या हक्काचा जो पैसा आहे तो जीएसटीचा परतावा आणि वेगवेगळ्या योजनांचे पैसे आम्हाला द्या, यासाठी केंद्राकडे जाऊन भांडलं पाहिजे. त्याऐवजी राज्याच्या कामकाजात अडचण होईल, असा त्यांचा प्रयत्न असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले.
भाजपचं आंदोलन फसलं आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. करोनाच्या संकटात राजकारण न करता सहकार्याची भूमिका घ्या, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी साथ दिली. पण मोदींच्या पक्षाचे राज्यातील नेतेच त्यांच्या आवाहनाला बगल देत महाराष्ट्रात राजकारण करण्यात आकंठ बुडालेले आहेत. सत्ता गेल्याने राज्यातील भाजपाचे नेते वैफल्यग्रस्त झाले असून, सत्तेसाठी त्यांची तडफड होतेय. विरोधी पक्षाने करोनाच्या संकटात सरकारला काही विधायक सूचना केल्या तर त्यांचे स्वागतच केले जाईल, परंतु त्यांना राजकारणच करायचे असल्याने रोज राजभवनाच्या फेऱ्या मारून आता त्यांनी घरच्या अंगणालाच रणांगण केले आहे, असे थोरात म्हणाले. चंद्रकांत पाटील यांचे खरे अंगण कोणते? पुणे की कोल्हापूर?
देवेंद्र फडणवीस तरी त्यांच्या नागपूरला गेले का? त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्तेच मदत करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. पाच वर्षे सत्तेत असताना महाराष्ट्राची फसवणूक करणाऱ्या भाजपच्या नेत्यांचा राज्य सरकारला बदनाम करण्याचा डाव पूर्णपणे फसला असून, या ‘मेरा आंगण मेरा रणांगण’ आंदोलनाचा बार फुसका ठरला आहे. या आंदोलनाला जनतेचा तर नाहीच, पण भाजप कार्यकर्त्यांचाही प्रतिसाद मिळाला नाही, अनेक ठिकाणी भाजप नेत्यांनी रखरखत्या उन्हात लहान मुलांना आंदोलनासाठी उभे करून वेठीस धरल्याचे पहायला मिळाले, असेही ते म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”