हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील एकजुटीबाबत आघाडीतील प्रत्येकांकडून अजून पुढील निवडणुका एकत्रित लढणार असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे भाजपकडून आघाडीत बिघाडी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशात आज बारामतीत एका कार्यक्रमप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही आघाडीत एकजुटी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आल्यानंतर काही गोष्टी सबुरीने घ्याव्या लागतात, असे म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आज बारामतीचा दौरा केला जात आहे. दरम्यान, बारामती नगरपरिषदेच्या कमर्शिअल कॉम्प्लेक्सच्या भूमीपूजन कार्यक्रमास त्यांनी हजेरी लावली. यावेळी ते म्हणाले की, बारामतीकरांना भल्या पहाटे काम करण्याची सवय शरद पवारांमुळे लागली आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचे राज्यावर संकट आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टींना मर्यादा आल्या आहेत. या काळातही राज्यात बारामतीसह अनेक ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. बारामतीकरांचे प्रेम, पाठिंबा आणि शरद पवार यांचे आशिर्वाद यामुळे हे सगळे होत आहे.
विकास कामे करण्यासाठी काहीगोष्टी जपणे महत्वाचे असल्याचेही पवारांनी यावेळी सांगितले. यावेळी पवारांनी सच्चर कमिटीच्या अहवालाचा उल्लेखही केला. याबाबत ते म्हणाले की, सच्चर कमिटीच्या अहवालात अनेक गोष्टी आल्या आहेत. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करु. सत्तेत असताना वेगवेगळ्या विचारांचे लोक असतात. यावेळी त्यांच्याशी आघाडी जपताना तसेच इतर कामे करताना जपून करावी लागतात. मात्र, वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आल्यानंतर काही गोष्टी सबुरीने घ्याव्या लागतात.. त्यांच्याशी चर्चाहि करावी लागते. मग त्यातून मार्ग काढून निर्णय घ्यावे लागतात, असेही पवारांनी म्हटले आहे.