कोरोनाचा अभ्यास करून ‘उद्धव साहेब’ अर्धे डॉक्टर झालेत, म्हणून…; अजितदादांची मिश्किल टिप्पणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाच्या संकटकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कोरोनाचा इतका अभ्यास केला की ते आता जवळपास अर्धे डॉक्टरच झाले आहेत. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना कोरोनाची लागण झाली पण कोरोना त्यांच्यापाशी फिरकलाच नाही, अशी मिश्किल टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ते गुरुवारी मुंबईत महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुक्तकंठाने तारीफ केली.

यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे कौतुक केले. या दोघांनी कोरोनाची औषधे, इंजेक्शन्स याचा इतका अभ्यास केलाय की दोघेही अर्धे डॉक्टर झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय केले पाहिजे, कसे केले पाहिजे, याचा सतत अभ्यास दोन्ही नेत्यांकडून सुरु होता. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना कोरोना झाला तरी त्यांच्यापाशी मात्र कोरोना फिरकलाच नाही, अशी टिप्पणी अजित पवार यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षभरात आपल्या कामाचा ठसा उमटवून दाखवला. नागरिक आणि प्रशासनात संघभावना निर्माण केली. तर दुसरीकडे त्यांनी अधिकाऱ्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य दिले. हे सगळे करत असताना त्यांनी पुढाकार घेऊन ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, ही मोहीमही राबवली. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याचअंशी नियंत्रणात राहण्यास मदत झाली, असे अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, अजित पवार यांनी महाविकासआघाडी सरकारला कोणताही धोका नसल्याचेही स्पष्ट केले. महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांची विचारधारा वेगवेगळी असली तरी जनहित हा आमचा समान कार्यक्रम आहेत. जोपर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या मनात महाविकासआघाडी सरकार चालवायचे हा निर्धार आहे तोपर्यंत या सरकारला कोणताही धोका नसल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.(Ajit Pawar praises CM Uddhav Thackeray work in last one year)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’