फडणवीसांकडून स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाला दिलासा; 20 लाखांचं कर्ज फेडलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात होती. स्वप्निलच्या कुटुंबियांवर कर्जाचा डोंगर होता. आज भाजपनं लोणकर कुटुंबीयांवर असलेल्या १९ लाख ९६ हजार ९६५ रुपये कर्जाची एकरकमी परतफेड करत लोणकर कुटुंबियांना दिलासा दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक छोटेखानी कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात स्वप्निल लोणकरचे वडिल सुनील तात्याबा लोणकर यांनी फडणवीस यांच्या हस्ते 19 लाख 96 हजार 965 रूपयांचा धनादेश सुपूर्द केला. स्वप्निलच्या कुटुंबियांवर शिवशंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित या संस्थेचं कर्ज होतं. तसंच त्याच्या वडिलांचा असलेला प्रिटींग प्रेसचा व्यवसायही बंद झाला होता.

लोणकर कुटुंबीयांच्या पाठीशी भाजप यापुढंही उभा राहील व भविष्यात स्वप्नीलसारखी वेळ कोणावरही येऊ नये असा आमचा प्रयत्न असेल,’ असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. स्वप्नीलच्या वडिलांनी यावेळी भाजपचे आभार मानले. आमदार गिरीश महाजन, गोपीचंद पडाळकर, मंगेश चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.

You might also like