मुंबई । केंद्राप्रमाणेच राज्य सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना केली आहे. आपल्या मागण्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन शेतकरी आणि बाराबलुतेदारांच्या प्रश्नांबाबतचं निवेदन सादर केलं. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र बचाव’ची भूमिका घेऊन राज्यपालांना निवेदन देण्यात आल्याचं सांगितलं.
”मजुरांना सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वेच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनी राज्य सरकारला घेरत ट्रेनच्या विषयात हे सरकार कातडी बचाऊ धोरण घेत आहे असा आरोप केला. केंद्राने ८५ टक्के तिकिटाचे पैसे दिले, राज्याने १५ टक्के द्यायचे होते, मात्र महाराष्ट्रातील अज्ञानी मंत्र्यांना रेल्वेच्या खर्च किती येतो हेच माहीत नाही. त्यामुळे ‘महाराष्ट्र बचाव’ची भूमिका घेऊन राज्यपालांना निवेदन देण्यात आलं आहे ” असं ते म्हणाले.
आम्हाला राजकारण करायचं नाही. पण जनतेच्या वेदना मांडल्या नाही तर जनतेला न्याय मिळणार नाही. त्यामुळे ‘महाराष्ट्र बचाव’च्या माध्यमातून सरकारला टप्प्याटप्प्याने जागं करणार आहोत. यात कुणाला राजकारण वाटलं तरी आम्हाला त्याची पर्वा नाही, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं. राज्य सरकारला जी मदत हवी असेल ती करू, त्यांनी आम्हाला सांगावं. सरकारने एखादा कठोर निर्णय घेतला तरीही आम्ही पाठिशी उभं राहू. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पहिली बैठकच दोन महिन्यांनी घेतली, आम्ही तर सहकार्य करायला तयारच आहे, त्यामध्ये केवळ औपचारिकता नको अशी भावना फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
परदेशात अडकलेल्यांना भारतात परतायचं आहे, महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जिथे विमानं उतरण्यास परवानगी नाही. लोक व्हिडिओ करून पाठवत आहेत, त्यांचे हाल होत आहेत. त्यांना तातडीने महाराष्ट्रात आणलं पाहिजे. विमाने उतरण्यास महाराष्ट्राने परवानगी द्यावी, त्यांना क्वारंटाईन करून उपचार करता येतील, मात्र त्यासाठी निर्णयाची गरज आहे, तोच निर्णय होत नाही अशी खंतही फडणवीस यांनी व्यक्त केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”