‘देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत किंमत नाही’ : नाना पटोलेंचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ‘भाजपने मागासवर्गीय जातीच्या लोकांवर अन्याय करण्याचे काम केले. लोकशाही चुकीच्या माणसाच्या हातात गेली की त्याला तडा जाणार हे बाबासाहेबांनी लिहून ठेवले होते. भाजप सरकारच्या काळात पंढरपूर नव्हे तर फडणवीसांचा विकास झाला. भाजपने आत्ता देश विकायला काढला आहे. समाधान आवताडे निवडून आल्यावर ते पंढरपूर विकायला काढतील, अशी टीका पटोले यांनी केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत कोणीही विचारत नाही,’ असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर केला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर घणाघाती टीका केली. मोदी महाराजांनी जनता कर्फ्युच्या नावाखाली थाळ्या वाजवायला सांगितल्या. त्यानंतर दिवे लावण्याचा उद्योग केला. या काळात मुस्लिम समाजामुळे कोरोना पसरतो, असं सांगून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. आतादेखील देशात कोरोनाची मोठी साथ पसरली आहे. आपण चौथ्या स्टेजमध्ये आहोत. आतापर्यंत देशाच्या पंतप्रधानांनी यावर उपाययोजना जाहीर करायला हव्या होत्या.

देशात सध्याच्या घडीला केवळ दोन कंपन्यांनाच लस तयार करण्याची परवानगी मिळाली आहे. आपले शत्रू असलेल्या पाकिस्तानला लस पुरविली जात आहे. मात्र, राज्यांना लसी दिल्या जात नाहीत, असे नाना पटोले यांनी म्हटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या काळात दुर्बल घटकांसाठी जाहीर केलेल्या 1500 रुपयांच्या मदतीवर आक्षेप घेण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस यांना नाही. केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर कर लावून पैसा गोळा करत आहे. भाजपने देश विकायला काढला आहे, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.

You might also like