हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल सांगली जिल्ह्यातील जतमधील 40 गावे कर्नाटकात घेणार असल्याचा दावा केला. त्यांच्या दाव्यावरून राज्यातील विरोधी पक्षातीळ नेत्यांकडून कर्नाटक सरकारवर जोरदार हल्ला चढवला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांना प्रत्युत्तर दिले आहे. “राज्यातील एक गावही कर्नाटकाला जाणार नाही. वेळ आली तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. पण कर्नाटकाला एकही गाव देणार नाही, असे फडणवीस यांनी म्हंटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आज नागपूरचा दौरा केला जात आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यानी काल एक विधान केले आहे. मात्र, महाराष्ट्रात असणारी बेळगाव, कारवार, निपाणीसह जी गावं आहेत कि आमची आहेत. ती सर्व गावे मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणारच आहोत. दोन्ही राज्यांच्या राज्यपालांची नुकतीच बैठक झाली होती. त्याआधी दोन्ही राज्यातील जलसंधारण मंत्र्यांचीही बैठक झाली होती. अशा बैठका झाल्याच पाहिजे. कारण आपण एकाच देशात राहतो. आपल्यात काही शत्रूत्व नाहीये. हा एक कायदेशीर वाद आहे. त्यामुळे चर्चा झाली पाहिजे.
कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काल बैठक घेतली होती. त्यांनी कर्नाटकातील आपल्या लोकांना मदत करण्याचा तसेच काही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या लोकांना मदतच होणार आहे. एकही गाव कुठे जाणार नाही. उलट इतर गावेही आपण मिळवणार आहोत, असे फडणवीस यांनी म्हंटले.
कर्नाटकचा जत तालुक्यावर डोळा; रोहित पवार शिंदे- फडणवीस सरकारवर संतापले
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/KbqQFC3y4t#Hellomaharashtra @RRPSpeaks
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2022
‘त्या’ 40 गावांचा ‘तो’ ठराव आजचा नाही
ज्यावेळी 40 गावांनी कर्नाटकात जायचा नाही तर पाणी मिळत नाही असा ठराव केला होता. तो ठराव हा आज केलेला नाही. तर मी मुख्यमंत्री असताना 2012 मध्ये केलेला आहे. आता नव्याने कोणत्याही गावाने कोणत्याही प्रकारचा ठराव केला नाही. आम्हाला पाणी मिळत नाही, असे कारण देऊन या गावांनी तेव्हा ठराव केला होता. मुख्यमंत्री असताना मी कर्नाटकसोबत बोलणी केली होती. त्यावेळी या गावांना पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असे फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री बोम्मई काय म्हणाले,
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी नुकताच माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आमचे कर्नाटक सरकार महाराष्ट्रातील कन्नड-माध्यमांच्या शाळांना अनुदान देईल आणि शेजारच्या राज्यात राहणाऱ्या कन्नडिग स्वातंत्र्यसैनिकांना निवृत्तीवेतनही देईल. त्यासाठी आम्ही आवश्यक कागदपत्रे गोळा करत आहोत. आम्ही जत तालुक्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे.