हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये असा इशारा दिला. त्यामुळे महाराष्ट्रातून बेळगावला जाणार्या मंत्री शंभूराज देसाई व चंद्रकांत पाटील यांचा दौरा रद्द झाला असल्याचीही चर्चा होत असून याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. “मंत्र्यांचा दौरा महापरिनिर्वान दिनानिमित्त होता. यासंदर्भात कर्नाटकचे काही म्हणणे आहे. मंत्र्यांनी ठरवले तर त्यांना जाण्यापसून कोणी रोखू शकत नाही. पण महापरिनिर्वाण दिनी अशा प्रकारचा वाद तयार करायचा का हा महत्त्वाचा विषय आहे. या संदर्भातील विचार करुन मुख्यमंत्री निर्णय देतील, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कर्नाटक – महाराष्ट्र सीमावाद संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यामुळे याबाबत कर्नाटक किंवा महाराष्ट्र सरकार निर्णय घेऊ शकत नाही. सर्व निर्णय सर्वोच्च न्यायलय घेणार आहे. या संदर्भात नव्याने वाद तयार करणं योग्य होणार नाही.
सीमावाद प्रश्नी न्यायालयात महाराष्ट्राने ताकदीने आपली बाजू मांडली आहे. त्यामुळे आपल्याला सर्वोच्च न्यायालयातून न्याय मिळेल यावर विश्वास ठेवायला हवा. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जरी येऊ नका असे म्हंटले असले तरी आपल्याला भविष्यात त्या ठिकाणी जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. कोणीही घाबरत देखील नाही. त्या दिवशी महापरिनिर्वाण दिन असल्याने काय करावं याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील,” असे फडणवीस यांनी म्हंटले.