फडणवीसांकडून नवा पेनड्राइव्ह बॉम्ब; संवादात अंडरवर्ल्डच्या उल्लेखाने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दुसरा पेनड्राईव बॉम्ब फोडला. फडणवीस यांनी ऑडिओ क्लिप सादर करत वक्फ बोर्डाचे डॉ. मुद्दशीर लांबे आणि अर्शद खान यांच्यातील संवाद उघड केला विशेष म्हणजे या संवादात अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा उल्लेख करण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

वक्फ बोर्डाच्या एका सदस्याने सामाजिक कार्यकर्त्या महिलेवर बलात्कार केला आहे. या महिलेने तशी तक्रार दिली आहे. तरीही हा सदस्य मोकाट आहे. शिवाय या वक्फ बोर्डातील सदस्यांचा बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमशी (dawood) संबंध आहे. तरीही हा माणूस वक्फ बोर्डात कसा? असा सवाल करत वक्फ बोर्डाच्या सदस्याच्या संवादाचा व्हिडीओच एका पेनड्राईव्हमधून त्यांनी विधानसभा अध्यक्षांना दिला.

या पेन ड्राईव्हमध्ये दोन पात्रं आहेत. मोहम्मद अर्शद खान आणि डॉ. मुदीस्सर लांबे. हे तेच डॉ. मुदीस्सर लांबे आहेत ज्यांची नेमणूक अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डावर केली होती. 31 डिसेंबर 2020 ला त्यांच्या विरोधात एका 33 वर्षीय सामाजिक कार्यकर्तीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला तेव्हा लांबेने लग्न करण्याची तयारी दाखवली आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकी या महिलेला दिली, असं फडणवीसांनी सांगितलं.

दरम्यान, या संवादात डॉ. लांबे म्हणतात की, माझे सासरे दाऊदचे राइट हँड होते, माझं लग्न हसीना आपा, इक्बाल कासकर पत्नी यांच्या मध्यस्थीने केले होते. त्यामुळे जरा काही झाले तर वरपर्यंत प्रकरण पोहचते. माझे सासरे संपूर्ण कोकण सांभाळायचे. मुंबईत माझे काका होतो. मी मदनपुरात होतो. माझ्या घरात काही झालं तर थेट भाईपर्यंत वाद पोहचतो. आपल्याकडे पाहिजे तेवढा पैसा आहे. वक्फचं काम करा. जे काही होईल त्यात तुझे अर्धे आणि माझे अर्धे असा उल्लेख आहे. ज्या फोनवरून अर्शद खानसोबत संवाद झाला ते मी सभागृहात दिलं आहे. अर्शद खान हा ठाण्याच्या जेलमध्ये आहे. त्याचा मोबाईल पोलिसांकडे आहे तो तात्काळ ताब्यात घ्यावा. चक्क दाऊदची माणसं वक्फ बोर्डावर नियुक्ती केलीत का? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात विचारला

Leave a Comment