मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातल्या सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये गणल्या गेल्याचा एक सर्व्हे काही दिवसांपूर्वी समोर आला होता. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या या सर्व्हेवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज फेसबुकद्वारे पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्याचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं एका सर्व्हेतून स्पष्ट झालं आहे. त्याबद्दल तुमचं मत काय? असा सवाल विचारला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
फडणवीस म्हणाले, ”मी हा सर्व्हे पाहिला नाही. सर्व्हे कुणी केला मला माहीत नाही. मात्र सोशल मीडियावर नजर टाकली तर मुंबईसह महाराष्ट्राची काय दैना झालीय हे पाहायला मिळतं. त्यामुळे कुणाची किती लोकप्रियता आहे हे समजतं. तरीही एखाद्या सर्व्हेत उद्धव ठाकरे हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरत असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा,” असं फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पुन:श्च हरी ओम ही संकल्पना चांगलीच आहे. सगळ्या राज्यांना सुरुवात करावी लागेलच. जमिनीवर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळाला पाहिजे. खुल्या दिलाने पुन:श्च हरी ओम करावं लागेल, तरच उद्योग सुरू होतील, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं. महाविकासआघाडी सरकारच्या तीन पक्षांमध्ये संवाद नाही. अधिकाऱ्यांबरोबरही संवाद नाही. अधिकाऱ्यांचा मंत्र्यांशी संवाद नाही, असा दावा फडणवीसांनी यावेळी केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”