पुणे प्रतिनिधी । विशाखा महाडिक
आज गणेशोत्सवाचा तिसरा दिवस असून राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पहायला मिळत आहे. पुण्यातील ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या वतीने उत्सव कालावधीत विविध धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार दररोज विविध कार्यक्रम पार पडत आहेत. दरम्यान कलाकार मंडळी तसेच राजकीय नेतेमंडळी बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जून उपस्थिती दर्शवत आहेत. नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ मंडळाला भेट दिली आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुवार दिनांक २१ सप्टेंबर २०२३ रोजी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला भेट दिली. यावेळी फडणवीसांनी लाडक्या बाप्पाचे दर्शन घेतले. तसेच बाप्पासमोर नतमस्तक झाल्यानंतर श्रींची मनोभावे आरती केली. यावेळी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्या समवेत मंडळाचे कार्यकर्ते तसेच मुख्य पदाधिकारी उपस्थित होते.
आतापर्यंत उत्सव कालावधीच्या तीन दिवसांमध्ये अनेक दिग्गज मंडळींनी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मंडळाला भेट दिली आहे. श्रींची प्राणप्रतिष्ठापना पद्मश्री पं. श्री विजय घाटे व सहपरिवार यांच्या हस्ते पार पडली. तर आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांतदादा जगताप, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी, मेजर जनरल विक्रांत नाईक (जनरल ऑफिसर कमांडिंग दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा सब एरिया) व परिवार, मेजर जनरल एस एस पाटील (ॲडिशनल डायरेक्टर जनरल टेरिटोरियल आर्मी दिल्ली) व परिवार, जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ साऊथ वेस्टर्न कमांड लेफ्टनंट जनरल बी एस राजू सर, अभिनेत्री साक्षी द्विवेदी, भाजप महाराट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाप्पाचे दर्शन घेतले आहे.