Monday, March 20, 2023

कोरोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलचे काम अतिशय चांगले : देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

सकलेन मुलाणी कराड

कराड ।  कोरोना काळात सुरवातीपासूनच कराड येथील कृष्णा हॉस्पिटलने मोठी कामगिरी बजाविली आहे. या हॉस्पिटलने आत्तापर्यंत एक हजाराहून अधिक रूग्णांना कोरोनामुक्त केले असून, कोरोनामुक्तीच्या या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलचे काम अतिशय चांगले आहे, असे कौतुकोद्गार राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले. कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

- Advertisement -

पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या श्री. फडणवीस यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे भेट देऊन कोरोनामुक्तीसाठी सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, भाजपाचे नेते शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थित होते.

यावेळी डॉ. सुरेश भोसले यांनी कोरोनामुक्तीसाठी कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध वैद्यकीय सुविधांबाबतचे सादरीकरणही करण्यात आले.

त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना श्री. फडणवीस यांनी कृष्णा हॉस्पिटलच्या कार्याचे कौतुक करत, पहिल्या दिवसांपासून सर्व त्या सोयीसुविधा सज्ज ठेवल्याने आज या हॉस्पिटलमधून 1000 हून अधिक पेशंट बरे झाले आहेत. कोरोनाविरूद्ध लढणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत सुमारे 1400 पॉझिटिव्ह रूग्ण उपचारासाठी दाखल झाले. पण यापैकी केवळ तीनच रूग्णांच्या उपचाराचा खर्च शासनाने कृष्णा हॉस्पिटलला परत दिला आहे. त्यातही आता शासनाने खाजगी हॉस्पिटलना रेमडिसेव्हिर इंजेक्शन देणे बंद केल्याचे समजतेय. ही इंजेक्शन कृष्णा हॉस्पिटलसारख्या खाजगी हॉस्पिटलना उपलब्ध न झाल्यास 35000 रूपये किंमतीची ही इंजेक्शन रूग्ण स्वत: खरेदी करू शकणार आहे का? याचा विचार शासनाने करायला हवा. रूग्णांच्या जीवाशी खेळण्यापेक्षा कोरोनामुक्तीसाठी लढणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलसारख्या संस्थांना शासनाने पाठबळ देण्याची गरज आहे.

यानंतर श्री. फडणवीस आणि आ. पाटील यांनी सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून, स्मृतीसंग्रहालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आप्पासाहेबांचा जीवनपट समजावून घेत, त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे अतिरिक्त संशोधन संचालक डॉ. डी. के. अगरवाल, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर उपस्थित होते.

स्व. जयवंतराव भोसले एक द्रष्टे व्यक्तिमत्व : फडणवीस

स्व. जयवंतराव भोसले स्मृती संग्रहालयाला भेट दिल्यानंतर तेथील वहीमध्ये आपला अभिप्राय नोंदविताना देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले, की ‘‘स्व. जयवंतराव भोसले म्हणजे एक द्रष्टे व्यक्तिमत्व. विविध उद्योग उभारून, तसेच शैक्षणिक क्रांती करून त्यांनी केलेली सेवा अतुलनीय आहे. आज त्यांचे पश्चात डॉ. सुरेशबाबा यांनी हे संपूर्ण उद्योगविश्व वर्धिष्णू केले आहे व आता तिसरी पिढी अतुलबाबांच्या रूपाने समाजसेवा करीत आहे. कृष्णा समूह हा एक अत्यंत लोकाभिमुख परिवार आहे. माझ्या अनंत अनंत शुभेच्छा..’’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’