मुंबई प्रतिनिधी | मराठा आरक्षणाच्या परीक्षेत सरकार पास झाल्यानंतर धनगर आरक्षणाच्या मुद्दयांवर सरकारला घेरण्याचा विरोधकांनी प्रयत्न सुरु केला आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार संवेदनशील नाही असे म्हणत धनंजय मुंडे यांनी सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. त्यामुळे आता धनगर आरक्षणावरून विरोधक सरकारची कोंडी करत राहणार असे दिसू लागले आहे.
धनगर आरक्षणाबाबतचा टीसचा अहवाल सभागृहात मांडण्याऐवजी अटर्नी जनरल यांच्याकडे पाठवला यावरून सरकारची असंवेदनशीलता दिसून येते. सरकारला धनगर आरक्षण द्यायचेच नाही असे चित्र सध्या दिसते आहे असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. धनगर आरक्षणावरून आज विधान परिषदेत चांगलाच गोंधळ उडाला. धनगर आरक्षणाच्या मुद्दयांवर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र आज विधी मंडळात पाहण्यास मिळाले.
दरम्यान धनगर आरक्षणावर चर्चा घेताच विरोधांपेक्षा सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सभागृहात अधिक गोंधळ घालण्यास सुरूवात केली. टीसच्या अहवालाचे काय झाले. धनगर आरक्षणाच्या मुद्दयांवर सरकारची काय भूमिका आहे. तसेच धनगर आरक्षणाच्या प्रश्नांची सोडवणूक कशी केली जाणार आहे या प्रश्नाकडे विरोधकांनी सत्ताधारी पक्षाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.