शरद पवारांना आणखी 3 आमदार सोडून जाणार? कोण आहेत ते?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) आपल्या 40 आमदारांसह शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. याचा मोठा धक्का शरद पवार (Sharad Pawar) यांना बसला असला तरी त्यांनी आता आगामी निवडणुकांसाठी आपली कंबर कसली आहे. शरद पवार यांच्याकडून राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये सभा घेण्यात येत आहेत. यादरम्यानच अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवार गटात खळबळ उडवणारं मोठं वक्तव्य केल आहे. “लवकरच आमच्या गटात आणखीन तिघांचा प्रवेश होणार आहे” असा दावा आत्राम यांनी केला आहे. त्यामुळे आता हे तीन आमदार कोण असतील असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

अजित पवार गटात आणखीन तीन आमदार येणार

माध्यमांशी संवाद साधताना, “शरद पवार गटाचे आणखी तीन आमदार हे अजितदादा गटात येणार आहेत. सध्या आम्हाला 45 आमदारांचं समर्थन आहे. त्यात तीन आमदार वाढून 48 होणार आहे. तीन आमदार नक्की येणार आहेत. पण त्यांची नावं मी सांगत नाही. पण येणार आहेत हे नक्की. विकासासाठी आमदार आमच्याकडे येत आहेत. विकास कामासाठी निधी मिळत आहे” असे धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटले आहे. त्यांच्यावर या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातून पुन्हा खळबळ माजली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी झालेल्या फुटी नंतर आजपासून अजित पवार गटाचे पक्षबांधणीसाठीचे दौरे सुरू झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून धर्मरावबाबा आत्राम आज यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्याकडे या भागातील संघटन बांधणी, सदस्य नोंदणी, अशा इतर कामांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावेळी बोलताना त्यांनी, निवडणुका जवळ आल्यात. वेळ कमी आहे. त्यामुळे आम्हाला ही स्ट्रॅटेजी वापरावी लागत असल्याचे सांगितले आहे.

मुख्य म्हणजे, अजित पवार गटात लवकरच तीन आमदार शामिल होतील असे वक्तव्य आत्राम यांनी केल्यामुळे शरद पवार गटाची धाकधूक वाढली आहे. जर आत्राम यांचा हा दावा खरा ठरला तर शरद पवारांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार फटका बसणार आहे. अगोदरच, अजित पवारांसह 40 आमदारांनी राष्ट्रवादीची सोडचिट्टी दिल्यामुळे पक्षाला गळती लागली आहे. आता शरद पवार पक्षात राहिलेल्या इतर आमदार, खासदारांसोबत आगामी निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत.