धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळे शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपींनी भरदिवसा एका पीएसआय अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला केला आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून एका पीएसआय अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला केल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे जर पोलीसच सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेचे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
काय आहे प्रकरण?
शिरपूरचे महामार्ग पोलिस ठाण्याचे अधिकारी पीएसआय एम.आय. मिर्झा हे त्यांच्या दुचाकीने श्रीराम पेट्रोल पंपाकडून बारापत्थर रस्त्याकडे जात होते. त्यावेळी त्यांनी समोरुन येणाऱ्या दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरुन बाईक चालकाशी वाद घातला. यानंतर त्या बाईक चालकाने मागचा पुढचा विचार न करता थेट पीएसआय एम.आय. मिर्झा यांच्यावरच घाव घातला.
PSI मिर्झा हल्ल्यात गंभीर जखमी
एका अज्ञात दुचाकीस्वाराने पीएसआय मिर्झा यांच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यामध्ये पीएसआय एम.आय. मिर्झा हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी धुळ्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.