औरंगाबाद – गंगापूर-वैजापूर मार्गावर शहरापासून आठ किमी अंतरावर काल रात्री उसाचा ट्रक व टेम्पोचा अपघात होऊन तीन तरुण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. रोहित अरविंद सुरवसे, आकाश क्षिरसागर दोघे सोलापूर, गणेश पप्पू शिरसाठ रा.आष्टी, बीड असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नाव आहे.
जालना मार्गावरील करमाड येथे रेल्वे बोगद्याचे काम चालू असून होळी निमित्ताने सुट्टी असल्याने येथील कामावरील चौघेजण कंपनीचा टेम्पो (एम.एच. 13 सी.यु. 1500) घेऊन शिर्डी येथे गेले होते; दर्शन करुन परत येत असतांना गंगापूर वैजापूर मार्गावर रात्री दहाच्या सुमारास वैजापूरकडे जाणार्या ऊसाचा ट्रक (एम.एच. 18 ए.ए. 2737) व टेम्पोचा समोररासमोर भीषण अपघात झाला. यात टेम्पोतील गंभीर जखमी चौघांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिघांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर जखमी शिवशंकर सांघवी रा. चाकूर यास प्राथमिक उपचारानंतर औरंगाबाद घाटी येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.
मृत तिघांपैकी गणेश आणि आकाश अभियंते असून रोहित व शिवशंकर हे साईड सुपरवायझर म्हणून काम करत होते. ट्रक चालक घटना स्थळावरून फरार झाला होता. अपघात एवढा भीषण होता की टेम्पोचा पुढचा भाग पूर्ण चेपला असून उसाचा ट्रक पलटी झाला होता यावेळी रस्त्यावर ऊस पसरल्याने या मार्गावरील दोन्हीकडील वाहतूक एक तास खोळंबळी होती. अधिक तपास गंगापूर पोलीस करीत आहे.
शहरात जाऊन येतो म्हणून सांगितले –
होळी निमित्ताने कंपनीचे काम बंद होते त्यामुळे हे चौघेजन औरंगाबाद शहरातून जाऊन येतो असे कंपनीत सांगून कंपनीची गाडी घेऊन गेले होते; मात्र शहरात न जाता त्यांनी थेट शिर्डी गाठली परत येतांनी काळाने त्यांच्यावर घाला घातला.