टीम, HELLO महाराष्ट्र। रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनांची धडक बसून एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जुन्नर तालुक्यातील पिंपरीपेंढारा गावात घडली आहे. हि घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सह्याद्रीच्या पर्वत रंगा आणि घनदाट जंगल असल्याने जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा मोठा वावर असतो. त्यामूळे या बिबट्या प्रणव क्षेत्रात कायमच बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडत असतात. या घटनांबरोबरच बिबट्यांचे अपघाती म्रुत्यूही होत आहेत. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पिंपरीपेंढार येथील साईनगर शिवारातील राणबाबा मंदिराजवळ नगर कल्याण महामार्ग पार करत असताना, पाच ते सहा वर्ष वयाच्या एका नर जातीच्या बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. या धडकेत बिबट्याचा जागीच म्रुत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनखात्याच्या अधिका-यांनी घटनास्थळी भेट देऊन बिबट्याचा म्रुतदेह ताब्यात घेतला आहे. या बिबट्यावर आळे येथील वनखात्याच्या कार्यालयात शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती वन खात्याच्या अधिका-यांनी दिली. यापूर्वीही याच महामार्गावर बिबट्याचा अपघाती म्रुत्यू झाला होता तर पुणे नाशिक महामार्गावर कांदळी गावच्या हद्दीत पण बिबट्याचा अपघाती म्रुत्यू झाला होता बिबट्यांचे वारंवार अपघाती म्रुत्यू होत असल्यामुळे बिबट्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे