हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे पुन्हा चुरस वाढली आहे. या निवडणुकीसाठी मतदानास सुरुवात झाली असून आमदार फुटू नये म्हणून तिन्ही पक्षांनी विशेष काळजी घेतली आहे. पण, मतदान सुरू झाल्यानंतरही राष्ट्रवादीमधील आमदारांची अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आपण नाराज असल्याचे सांगत फोनच बंद केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे टेन्शन वाढले आहे.
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान करण्यासाठी सर्व आमदार मुंबईत हजर झाले आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील मुंबईत दाखल न झाल्यामुळे ते राष्ट्रवादीवर नाराज असल्याच्या चर्चा केल्या जात होत्या. दरम्यान त्यांनी आज आपली नाराजी उघडपणे सांगितली असून त्यांनी आपला मोबाईलही बंद ठेवल्यामुळे राष्ट्रवादीचे टेन्शन वाढले आहे. आमदार दिलीप मोहिते यांनी मी अजूनही नाराज आहे. आम्ही सांगितलेली कामं बोलुनही होतं नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या मतदानावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांनी मतदान न करण्याचे सांगितले आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते मुंबईत पोहोचलेले नाही. तर आशुतोष काळे हे सुद्धा मुंबईत अद्याप पोहोचले नाही. मात्र, हे तिन्ही आमदार मतदान प्रक्रिया पार संपण्याच्याआधी मुंबईत पोहोचतील, असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे.