हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल पुणे येथे भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला. या कार्यक्रमात घडलेल्या घटनेवरून आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘कालच्या घटनेमध्ये चूक कोणाची आहे हे तपासले जाईल. त्यामध्ये जर राष्ट्रवादीची चूक असेल तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील आणि भाजपाची असेल तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील, असे वळसे पाटील यांनी सांगितले.
मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपाच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी महिलांना मारहाण करणे ही आक्षेपार्ह बाब आहे. त्यामुळे त्यांच्यावर जी कारवाई अभिप्रेत आहे ती कारवाई होईल. या प्रकरणाची अधिक चौकशी केली जात असल्याचे यावेळी वळसे पाटील यांनी सांगितले.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र काम करतायत
मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सध्या मै विकास आघाडी सरकारमध्ये धुसफूस असल्याच्या चर्चेवरही प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, मला वाटतं की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र काम करतायत. एखाद्या लहान मोठ्या प्रश्नावरून मतभेद झाला तर लगेच महाविकास आघाडीत गडबड आहे, असा त्याचा अर्थ काढायचे कारण नाही. सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे की आपल्याला भाजपासोबत लढायचे आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांनी एकत्र काम केले पाहिजे असेही पाटील यांनी म्हंटले.