जुन्या थकबाकीदारांवर आता थेट जप्तीची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मालमत्ता कराच्या वसुलीसाठी आणि आर्थिक वर्ष संपण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक आहेत. राहिलेल्या दिवसांत मालमत्ता कर वसुलीसाठी युद्धपातळीवर मोहीम राबवली जाणार आहे. तर ज्यांच्याकडे वर्षानुवर्षे दाद देत नाहीत अशा थकबाकीदारांवर आजपासून थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

कोरोना महामारीमुळे 2020 पासून महापालिकेचे शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. तथापि आता कोरोनाची लाट ओसरली आहे. बाजारपेठा सुरू झाल्या, औद्योगिक कंपन्यांसह सर्व व्यवहारदेखील पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीकडे महापालिका प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षांत डिसेंबर अखेरपर्यंत 100 कोटी रुपयांची कर वसुली झाली. मात्र, मध्यंतरी कोरोनाची तिसरी लाट आली आणि कर वसुली पुन्हा थोडी थंडावली.

घराघरांत कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे कर वसुली पथकांनी देखील वसुलीचे काम थांबविले होते. त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची अपेक्षेप्रमाणे वसुली झाली नाही. तरीही या दोन महिन्यांत 35 कोटी रुपयांचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला. आता आजपासून मार्च महिन्यातील केवळ 11 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीवर महापालिका अधिक भर देणार आहे, अशी माहिती उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली.

महापालिकेने थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागनिहाय बैठका घेऊन पथके स्थापन केली आहेत. मालमत्ता कर वसुलीचे यंदाचे उद्दिष्ट 468 कोटी रुपये देण्यात आले. त्यापैकी आतापर्यंत 109.80 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला आहे. तर 29.32 कोटी रुपयांची पाणीपट्टी वसूल केली आहे. पुढील अकरा दिवसांत होता होईल तेवढे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे.

Leave a Comment