सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्याचा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाैरा केला. या दाैऱ्यात जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर निधी देण्याची घोषणाही झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत पक्षाची सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झाली आहे. त्यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी आता पुन्हा एकोप्याने जावूया असे म्हणताना, चक्क विधानपरिषदेचे सदस्य आ. शशिकांत शिंदे यांचे नांव घेण्याचे टाळले. त्यामुळे अजित पवार आणि शशिकांत शिंदे यांच्यातील दूर अजूनही असल्याचे स्पष्ट दिसून आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज सातारा दाैऱ्यावर असताना आ. शशिकांत शिंदे हे दोन हात लांबच दिसून आले. त्यामुळे सातारा जिल्ह्या बॅंकेच्या निवडणुकीच्या निकालानंतरचे मनभेद आजही पहायला मिळाले. नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातही शिंदे व पवार लांबच होते. तर सातारा शहरातील शासकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेच्या भूमिपूजन प्रसंगी फोटोत शशिकांत शिंदे दिसलेच नाहीत. तर शासकीय विश्रामगृहात अजित पवार यांच्या उजव्या बाजूला पालकमंत्री बाळासाहेब पाटील तर डाव्या बाजूला भाजपचे आमदार व अजित पवारांचे विश्वासू आणि सध्या शशिकांत शिंदे यांचा पराभव करण्यासाठी कारणीभूत असलेले राजकीय विरोधक आ. छ. शिवेंद्रसिंहराजे होते. याठिकाणी पालकमंत्र्याच्या शेजारी दोन हात लांब शशिकांत शिंदे होते.
या सर्व घडामोडीनंतर पत्रकार परिषदेत पक्षवाढी संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समितीत आमचे रामराजे नाईक- निंबाळकर, बाळासाहेब पाटील, मकरंद आबा, दिपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, खासदार श्रीनिवास पाटील आहेत. सातारची खासदारकीची निवडणूक किती गाजली हे उभ्या महाराष्ट्राने बघितले. त्यामुळे आता पुन्हा एकोप्याने जावूया. यावेळी अजित पवार यांनी शशिकांत शिंदे यांचे नाव टाळल्याने हा राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरणार आहे.