औरंगाबाद | खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयाशेजारी सुरू असलेले अनधिकृत बांधकाम मनपा अतिक्रमण पथकाच्या वतीने काढण्यात आले. पूर्व नोटीस देऊन देखील संबंधितांनी खुलासा न केल्याने बांधकाम काढण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र खासदार जलील यांच्या संगण्यावरूनच ही कारवाई झाल्याची खमंग चर्चा शहरभर सुरू होती.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खासदार जलील यांच्या कार्यालयाला खेटूनच मतीन खान खिजर खान यांचे बांधकाम सुरू होते. यापूर्वीच मनपा पथकाच्या वतीने खान यांना नोटीस बजावण्यात आली होती. तसेच बांधकाम साहित्यदेखील दोन वेळेस जप्त करण्यात आले होते. खान यांनी नोटीस बाबत खुलासा देखील केला नाही. दुसरीकडे अरेरावी करून बांधकाम सुरूच ठेवले. यामुळे मंगळवारी जेसीबी व ब्रेकर च्या माध्यमातून हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. ही कारवाई वसंत भोये, सविता सोनवणे, आर. एस. राचतवार, इमारत निरीक्षक सय्यद जमशिद, पी.बी. गवळी, मजहर अली, एम आर सुरासे, सागर श्रेष्ठ, रवींद्र देसाई आदींनी केली.
खासदारांच्या सांगण्यावरून कारवाई?
खासदारांच्या कार्यालयाशेजारी बांधकाम सुरू होते. यामुळे खासदार जलील यांच्या सांगण्यावरूनच ही कारवाई झाली काय ? अशी चर्चा परिसरात ऐकायला मिळाली. मात्र या प्रकरणात खासदार जलील यांच्या कडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.