भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचा छातीत चाकू भोसकून खून; औरंगाबाद शहरात खळबळ

औरंगाबाद | पूर्ववैमनस्यातून एका तरुणाने उभ्या चौघांवर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय पत्रकारच जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अंगूरी बाग परिसरात घडली. पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवत आरोपींना अटक केली. परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

सय्यद दानिशोद्दीन सय्यद शाफिओद्दीन वय-22 (रा.अंगुरीबाग) असे मृत तरुणाचे नाव आहे तर शेख सलीम, शेख बाबा, शेख जब्बार अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर नितीन उर्फ गब्या भास्करराव खंडागळे वय-27 (रा.अंगुरीबाग) सह त्याची आई,बहीण, व भावाला पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी सूत्रानुसार मिळालेली अधिक माहिती अशी की, जखमी शेख जब्बार उर्फ शम्मू सोबत आरोपी गब्याचा दोन महिन्यांपूर्वी वाद झाला होता. तेंव्हा पासून गब्याच्या मनात खुमखुमी होती. मंगळवारी रात्री अंगुरीबाग भागात बाबा, जब्बार आणि सलीम असे तिघे तिथे बोलताना उभे होते. दानिश बाजूला असलेल्या एका घराच्या ओट्यावर बसलेला होता. दरम्यान तेथे आरोपी गब्या आला व त्याने धारदार चाकू काढत जब्बारवर हल्ला चढविला. सलीम आणि बाबा यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता गब्याने त्यावर देखील वार केले. हे पाहून बाजूला मोबाईल बघत बसलेला दानिश तेथे आला व भांडण सोडवीत असताना गब्याने धारदार चाकू दानिशच्या छातीत भोसकले. रक्तबंबाळ अवस्थेत तो जमिनीवर कोसळला. आरडाओरड झाल्याने गब्याने तेथून पळ काढला. परिसरातील नागरिकांनी चौघा जखमींना रुग्णालयात हलविले मात्र चौघां जखमीमधील दानिशचा मृत्यू झाला. ही बाब समजताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत आरोपी गब्या त्याची आई, बहीण आणि भावाला अटक केली.

घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा तगडा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गणपत दराडे करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.