कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
शिवसेनेची रविवारी आज बैठक होणार आहे. त्यामध्ये आमदार महेश शिंदे आणि पक्षाचे पदाधिकारी यांची चर्चा केली जाईल. त्यानंतर किती जागा लढायचा यांचा निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी पक्षाकडून विचारणा झाल्यास पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करून आम्ही आमच्या शिवसेना पक्षाची व काॅंग्रेसची काय भूमिका घ्यायची ते बाबा ठरवतील, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
कराड येथे खरेदी विक्री संघाच्या एका कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेची काय भूमिका राहणार याविषयी मत मांडले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील आदी उपस्थित होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची निवडणूकीचे पडघम वाजले असून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. सातारा जिल्ह्यात बॅंकेत महाविकास आघाडी कि स्वतंत्र लढणार याविषयी अद्याप एकमत झालेले नाही. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यकर्त्यांशी व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करत आहे.
आता निर्णय नाही, चाचपणी सुरू : आ. पृथ्वीराज चव्हाण
जिल्हा बॅंकेची रणनिती ठरविण्यासाठी आम्ही आमच्या पक्षांची बैठकी घ्यायला सुरूवात केलेली आहे. सर्वच पक्ष आपआपली रणनिती आखत आहेत, शेवटी निष्पन्न होईल हे बघावे लागेल. आता प्रत्येक पक्षांच्या अंतर्गत बैठका सुरू आहेत. पुढे अजून कधी एकत्रित बसायचे ठरले नसून एकत्रित बसल्यानंतर निवडणुकीची रणनिती ठरेल. आतातरी स्वतंत्र किंवा महाविकास आघाडी म्हणून लढायचे ते सांगता येत नाही. आम्ही आमच्या पक्षांची ताकद आजमावत आहोत. आमचे किती लोक निवडणुकीसाठी इच्छुक आहेत, त्यानंतर काय करायचे ते ठरेल. आमची चाचपणी सुरू असून आमचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. परंतु सर्वांशी बोलल्यानंतरच काय करायचे ते ठरेल. सध्या तरी काॅंग्रेस पक्षाकडून जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीबाबत चाचपणी सुरू असल्याचे माजी मुख्यमंत्री व काॅंग्रेसचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.