औरंगाबाद – औरंगाबाद येथे प्रस्तावित असलेली मेट्रो रेल्वे ही जालन्यापर्यंत व्हावी, अशी मागणी राजकीय क्षेत्रानंतर आता औद्योगिक क्षेत्रातून ही होत आहे. शेंद्रा औद्योगिक वसाहतीपर्यंत प्रस्ताविक ही मेट्रो जालना शहरापर्यंत आली तर त्याचा जालना औद्योगिक क्षेत्राला ही फायदा होईल. तसेच रेल्वेला अपेक्षित उत्पन्न मिळेल त्यामुळे ही मेट्रो रेल्वे जालन्यापर्यंत आली पाहिजे असा सुरू निघत आहे.
दरम्यान औरंगाबाद येथील वाळूज ते शेंद्रा औद्योगिक वसाहत मेट्रो रेल्वे मार्ग विचाराधीन असून याचा तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार होण्यास अजून अवधी आहे. मात्र, या तपशीलवार प्रकल्प अहवालात जालना शहरापर्यंत मेट्रो रेल्वेचा ही विचार केला जावा, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
वाळूज एमआयडीसी ते शेंद्रा डीएमआयसीला जोडणारी मेट्रो रेल्वे सेवा प्रस्तावित आहे. त्यासाठी डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यासाठी महामेट्रोला देण्यात आले आहे. डीपीआरसाठी लागणारा खर्च औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनतर्फे केला जाणार आहे. यासोबतच वाळूज ते शेंद्रा एकच उड्डाणपूल तयार करणे व शहराचा सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा (सीएमपी) तयार केला जाणार आहे. येत्या आठ ते नऊ महिन्यात डीपीआर तयार होईल, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.