औरंगाबाद शहरातील दहावी व बारावीच्या शाळा सोमवारपासून होणार सुरू; ‘ही’ आहे नियमावली 

औरंगाबाद – राज्य शासनाने सोमवार पासून पहिली ते बारावी च्या शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतु स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या इयत्ता 10 वी व 12 वी च्या शाळा/वर्ग दिनांक 24 जानेवारीपासून सुरू करण्याचा आदेश आज महानगरपालिकेने काढला आहे. शाळा व्यवस्थापक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व इतरांसोबत केलेल्या चर्चेनुसार मार्गदर्शक सूचनानूसार महानगरपालिका हद्दीतील फक्त इयत्ता 10 वी व 12 वी चे प्रत्यक्ष वर्ग अटी व शर्तीच्या अधिन राहून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी यासंदर्भात आज आदेश पारीत केले आहे.

या आदेशात नमूद केले आहे की, कोविड 19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त हे सक्षम प्राधिकारी म्हणून घोषीत केलेले आहेत. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील मनपा शाळा व खाजगी शाळा यांच्या बरोबर चर्चा करून औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील शाळा सुरु करण्यासाठी समीती गठीत करण्यात आली आहे. ही समिती नियमांचे पालन करून घेणार आहे.

काय आहे नियमावली – 

– शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. तसेच शाळा सुरु करण्यासाठी ४८ तासांपूर्वीची सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कोव्हिड 19 आरटीपीसीआर चाचणी करणे बंधन कारक राहील.

– विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.

– कोरोनाबाबत केंद्र व राज्य शासनाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांकडून आवश्यक ती लेखी संमती घेण्यात यावी.

– विद्यार्थी किंवा शिक्षक कोव्हिडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करून शाळा निजंतूकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करून घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकिय अधिकान्यांच्या सल्लाने वैद्यकिय उपचार सुरु करावेत.

– ज्या विद्यार्थ्यांनी लसीकरणाच्या पहिला डोस घेतलेला असेल अशा विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात यावा. ज्या विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा पहिला मात्रा घेतलेला नसेल त्यांना शाळेमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये.

– ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पध्दतीचा पर्याय निवडलेला असेल त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन/ ऑफलाईन/ दुरस्थ शिक्षण पूर्वी प्रमाणे सुरु ठेवावे.

– सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, खाजगी वाहन चालक, कंडक्टर, रिक्षाचालक यांनी दोन्ही लसीकरणाचे डोस घेणे आवश्यक आहे.

– विद्यार्थ्यांना आवशयक्तेनुसार शाळेत टप्प्याटप्प्याने तसेच एक दिवसाआड बोलविण्यात यावे.

– विद्यार्थ्यांना शाळेत मध्यांतराची सुट्टी न देता वर्गातच सुरक्षीत अंतर ठेवून जेवणाची व्यवस्था करावी.