हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पुराचा फटका बसलेल्या भागाचा नुकताच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही दौरा केला. यावेळी नुकसानग्रस्त भागातील वीजवसुली करू नये, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती मंत्री राऊत यांनी दिली.
राज्यात महापुरामुळे शेती पिकांचे तसेच ग्रांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात आता नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त भागातील नागरिकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली. यावेळी मंत्री राऊत म्हणाले की, “ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा पूरग्रस्त भागात वीजवसुली करु नये असे आदेश दिले आहेत. परिस्थिती पूर्ववत होत नाही तोवर वीजबिलंदेखील दिली जाणार नाहीत. लोकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, मंत्री नितीन राऊत यांनी यावेळी वीजबिल माफ करण्यासंदर्भात निर्णय मंत्रिमंडळाकडे असल्याचे सांगितले. त्यामुळे अगोदरच मोठ्या प्रमाणात महापुरामुळे शेती, पिके वाहून गेली आहेत. तर घरांवर दरडी कोसळून घरांचीही पडझड झाली आहे. अशात वीजबिलात माफी मिळेल का? अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र, मंत्री राऊत यांनी आज नुकसानग्रस्त भागात वीजबिल वसुली करू नये, असे निर्देश दिले आहे.