हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याविरोधात समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडेंनी नवाब मलिकांविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने वानखेडे कुटुंबियांना दिलासा दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत नवाब मलिकांना वानखेडेंच्या परिवाराविरोधात कोणतीही टीका आणि वक्तव्य करता येणार नाही असे कोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत.
काय आहेत कोर्टाचे निर्देश-
पुढील सुनावणीपर्यंत आठवडाभर फिर्यादी ज्ञानदेव वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध कोणतेही ट्विट किंवा सार्वजनिक वक्तव्यं केली जाणार नाहीत, मग ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही प्रसिद्धी माध्यमातून असोत, असं मुंबई हायकोर्टाने सांगितलं आहे.
दरम्यान, नवाब मलिकांनी सकाळी दोन ट्वीट केले. त्यातील दुसऱ्या ट्वीटमध्ये मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांवर आणखी एक आरोप केला. मलिक यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हणाले की, “आणखी एक फर्जीवाडा…अंतिम संस्कार करताना मुस्लिम आणि सरकारी दस्तावेजांसाठी हिंदू? धन्य आहेत दाऊद ज्ञानदेव.” असे म्हटले. हा दावा करताना नवाब मलिकांनी काही कागदपत्रांचे फोटोही ट्वीट केले आहेत.