काँग्रेसला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होतं का?; संजय राऊत यांच्या विधानानंतर फडणवीसांचा सवाल

0
39
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल पुण्यात एका कार्यक्रमामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या करीमलाला याला भेटायच्या असे विधान केले होते. त्यावरुन विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. संजय राऊत यांच्या विधानांवर काँग्रेसने खुलासा करावा, अशी मागणी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आता केली आहे.

काँग्रेसला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होतं का? यापेक्षा जास्त बदनामीकारक काही असू शकत नाही. त्यामुळे काँग्रेसने यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे असे फडणवीस म्हणाले. संजय राऊत यांनी कालच्या आपल्या कार्यक्रमात दाऊद इब्राहिमचे नाव घेतले होते. अंडवर्ल्डच्या या गुन्हेगारांमुळेच मुंबईवर हल्ले झाल्याची आठवण फडणवीस यांनी करुन दिली. ‘संजय राऊत यांनी केलेली विधानं अत्यंत धक्कादायक असून त्याबाबत अद्याप काँग्रेसकडून कुणी बोलायला तयार होत नाही. यातच काँग्रेस पक्ष सत्तेसाठी किती स्वार्थी असल्याचं दिसून येतं’, असा आरोप फडणवीस यांनी केला.

 

संजय राऊत यांच्या वक्तव्याला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी समर्थन देणार का? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. ‘अंडरवर्ल्ड गुंड छोटा शकील आणि दाऊद हे त्यावेळी मुंबई चालवायचे हे राऊतांचं विधान खरं आहे का? पोलीस कमिश्नरांची निवड अंडरवर्ल्ड डॉनच्या सांगण्यानुसार होत असे अशा भयानक विधानांवर काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवं’, असं फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले होते संजय राऊत
एककाळ असा होता की, दाऊद इब्राहिम, छोटा शकील, शरद शेट्टी मंत्रालयात बसायचे. मुंबईचा पोलीस आयुक्त कोण होणार? हे तेच ठरवायचे. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या करीम लालाला भेटायच्या. आम्ही ते अंडरवर्ल्ड पाहिले आहे, आता जे आहे ते चिल्लर आहे असे राऊत म्हणाले होते. दाऊद इब्राहिमला आपण दम भरल्याचा दावाही त्यांनी केला होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here