बाबांनो! राजकारणाच्या भानगडीत पडू नका! मी आलो अन अडकलो; आता बाहेरही पडता येईना- अजित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । ”मी राजकारणात आलो आणि अडकलोय, कुठं जाता येईना आणि बाहेरही पडता येईना, तेव्हा राजकारणाच्या भानगडीत पडू नका!” असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पुणे जिल्हा परिषदेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या वेळी अजित पवारांनी विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तुफान फटकेबाजी केली.

आम्ही कधीपर्यंत खुर्चीवर, तर जनतेने सांगितलं तोपर्यंत. जनता म्हटली घरी बसा, की चाललो आम्ही. पण सीईओ बघा. जोपर्यंत रिटायर होत नाही, तोपर्यंत खुर्चीवर असतो. शिवाय प्रमोशन होत जातं. अभिनेता, कला, संगीत, पत्रकारिता अशी वेगवेगळी क्षेत्र निवडू शकता. असं क्षेत्र निवडा ज्यातून आनंद आणि पैसे मिळतील, याचा विचार करा. नाहीतर घरात गेला की भांडी आदळली नाही पाहिजे, ‘आला मेला’ असं नाही झालं पाहिजे, असं अजित पवार म्हणताच हशा पिकला.

कोरोनाच्या महामारीमुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नवं माध्यम स्वीकारलं पाहिजे. ऑनलाईन शिक्षण सुरु आहे, पण कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे काळजी घेतली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. माझा उच्चार व्यवस्थित व्हावा, यासाठी मी मास्क काढला, नाहीतर तुम्ही म्हणाल या बाबानेच मास्क घातला नाही आणि आम्हाला सांगतोय, असं अजित पवार म्हणताच विद्यार्थ्यांमध्ये खसखस पिकली.मला खूप जण भेटतात. कोरोनामुळे आमची नोकरी गेल्याचं सांगतात. त्यामुळे मुलांनो करिअर निवडताना विचार करा, आपल्या वडिलांना विचारा, व्यवसाय करता येईल का? प्रशासकीय सेवेत येता येईल का? याचा विचार करावा, असा कानमंत्र अजित पवारांनी दिला.

कोणत्याही क्षेत्रात जा, पण आई वडिलांचे नाव रोशन करा, असा सल्ला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिला. चारित्र्याला डाग लागणार नाही, याचा विचार करा, विश्वासार्हता संपली की माणूस संपतो. मित्र निवडताना चांगले मित्र निवडा, मित्रच बरबाद करायला असतात, अशा कोपरखळ्याही अजितदादांनी मारल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.