माझी कळ काढू नका. अन्यथा जड जाईल : हसन मुश्रिफांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : धनंजय महाडिक माझी कळ काढू नका, मी जर प्रकरणं काढायला लागलो, तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा सज्जड दम ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाडिकांना दिला. उगाच उणी दुनी न काढता गोकुळचा प्रचार करा, असे सांगून वासाचं दुध, दुधाचे टँकर, नोकर भरतीतील भष्ट्राचार, ही प्रकरण मी बाहेर काढली तर तुम्हाला जड जाईल. असा इशाराही त्यांनी दिला.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते पुढे म्हणाले, डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना पालकमंत्री सतेज पाटील सक्षमरित्या चालवत आहेत, मी माझा संताजी घोरपडे कारखाना व्यवस्थितरित्या चालवत आहे, महाडिक तुम्ही तुमच्या भीमा कारखान्याकडे लक्ष द्या अन्यथा पळता भुई थोडी होईल.

महाडिक हे आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी गोकुळ मोडण्यासाठीच विरोधक एकत्र आल्याचा आरोप केल्याचे मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर मुश्रीफ यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मुश्रीफ म्हणाले, मी आतापर्यंत कोणाच्याही विरोधात बोललो नाही. पी. एन. पाटील यांच्याशी चर्चा करतानाही मी १५, २० लाख रुपये घेवून नोकऱ्यांचा बाजार याविषयी संताप व्यक्त केला होता. गोकुळ दूध उत्पादकांच्या मालकीचा करू, वासाच्या आणि कमी प्रतीच्या दुधाचा मोबदला देऊ आणि शेतकऱ्यांना दोन, चार रुपये जादा दर देऊ अशी आमची भूमिका आम्ही मांडली. माझ्या जिल्हा बँकेसह साखर कारखाना, अन्य संस्था चांगल्या चालल्या आहेत. त्यामुळे महाडिक यांनी माझ्यावर टीका करू नये. मुंबई, पुण्यातील दूध विक्री, भीमा कारखान्याचं मी बाहेर काढलं तर मग वाईट होईल, असेही ते म्हणाले.

You might also like