ठाणे : हॅलो महाराष्ट्र – भिवंडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी जवळील अंबाडी रस्त्यावर असणाऱ्या पेंढरी पाडा या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका वृद्ध दांपत्याची धारधार शस्त्राने निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे. जगन्नाथ पाटील आणि सत्यभामा पाटील असे या वृद्ध पती पत्नींची नावे आहेत. हे दोघेही वज्रेश्वरीजवळ अंबाडी रस्त्यालगत आपल्या घरात दोघेच शेती करून राहत होते. या दांपत्याची तीस एकारपेक्षा जास्त जमीन असून त्यांनी शेताजवळ एक तलावसुद्धा काढला आहे. हि घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी सदर पती पत्नी अजून बाहेर कसे आले नाही हे बघण्यासाठी घराजवळ असलेल्या घरातील एका मुलाने खिडकीतून पाहिले असता हे दोघे पती पत्नी रक्ताच्या थाळोऱ्यात आढळून आले. यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. मृत महिलेच्या अंगावर दागिने तसेच असल्यामुळे हि हत्या चोरीच्या उद्देशाने केली नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यामुळे या वृद्ध दांपत्याचा खून नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला याचा शोध पोलीस घेत आहेत.
या वृद्ध दांपत्याला दोन मुले असून ते बाहेर वास्तव्यास आहेत तर काही नातेवाईकांशी त्यांचा जमिनीच्या कारणावरून वाद सुरु होता. तसेच या दोघा पती पत्नींची काही महिन्यांपूर्वी मुंबई वडोदरा या महामार्गामध्ये त्यांची जागा गेली होती त्यामुळे त्यांना त्याची मोठी रक्कम मिळाली होती अशी माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. गणेशपुरी पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखा ठाणे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी दिली आहे.