विदर्भावर 70 वर्षांपासून अन्यायच,15 ऑगस्टला स्वतंत्र विदर्भाची घोषणा करा…; माजी आमदाराचं पंतप्रधानांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी नागपूरचे माजी आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं आहे. “मागील 70 वर्षांपासून महाराष्ट्रात राहून विदर्भावर अन्यायच होत आहे. त्यामुळे 15 ऑगस्टला विदर्भ राज्याची घोषणा करावी,” अशी मागणी पत्राद्वारे देशमुख यांनी केली आहे.

माजी आ. देशमुख यांनी नुकतेच चार पानांचं पत्र पंतप्रधान कार्यालयाला पाठवले आहे. यामध्ये त्यांनी परदेशामध्ये कशापद्धतीने छोट्या राज्यांची निर्मिती करण्यात आली आहे, याबाबत सांगितले आहे. पत्रात त्यांनी म्हंटले आहे की, “भारतात 75 @ 75 लहान राज्यांच्या निर्मितीची सुरुवात विदर्भापासून करावी. महाराष्ट्र राज्याच्या शेजारी निर्माण झालेल्या लहान राज्यांची प्रगती वेगाने सुरू आहे. विदर्भासारखा सुजलाम सुफलाम प्रदेश आजही मूलभूत सुविधांसाठी लढत आहे.”

“विदर्भात विकासाचे चित्र अजिबात दिसत नाही, ते निर्माण केल्याशिवाय विदर्भाला आर्थिक समृद्धी येणे अशक्य आहे. त्यासाठी छोटे राज्य ‘विदर्भ’ निर्माण करण्याची गरज आहे. जेणेकरून विदर्भातील लोकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळतील. नोकऱ्यांसाठी युवकांना दुसरीकडे स्थलांतर करावे लागणार नाही. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर अंकुश बसेल.”

 

“शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नवीन उद्योग न येणे, इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, सेवा क्षेत्रांमध्ये न होणारी गुंतवणूक, उद्योगांची होत असलेली अधोगती असे विदर्भातील अनेक गंभीर प्रश्न कायम दुर्लक्षित राहिले. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतील सर्वच क्षेत्रातील विकास कामांवर दुष्परिणाम झाला असून अनुशेष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विदर्भ राज्य निर्माण झाल्यास आर्थिक विकास होईल, लोकांचे जीवनमान उंचावेल,” असे देशमुख यांनी पत्रात म्हंटले आहे.

Leave a Comment