नवी दिल्ली । क्रिकेटमध्ये चेंडू चमकावण्यासाठी थुंकीचा वापर करणं ही क्रिकेटमधील एक सामान्य ट्रीक आहे. विशेषत: टेस्ट क्रिकेटमध्ये लाल चेंडूवर थुंकीचा वापर स्विंग करण्यासाठी मदत होते म्हणून केला जातो. पण आता थुंकीचा वापरावर बंदी लागू शकते. कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवल्यानंतर जेव्हा क्रिकेट सुरू होईल तेव्हा खेळाडूंना त्याची लागण होऊ नये म्हणून आयसीसीकडून चेंडूवर थुंकी लावण्यावर खळाडूंना बंदी घातली जाऊ शकते. यासंदर्भात भारताचा माजी कर्णधार आणि फिरकीपटू अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखालील आयसीसी क्रिकेट समितीने ही शिफारस केली आहे.
या संदर्भात आयसीसीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक घेतली आहे. या बैठकीत गठीत केलेल्या समितीने प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यात अटस्थ अंपायरचा नियम मागे घेण्यावर जोर दिला. सध्याची परिस्थिती असामान्य आहे. त्यामुळे समितीच्या या शिफारसी अंतरिम आहेत. यात सर्वांच्या सुरक्षेची काळजी घेता येईल आणि क्रिकेटला पुन्हा रुळावर आणता येईल, असे समितीने म्हटले आहे. समितीचा अध्यक्ष असलेल्या अनिल कुंबळे यावर आपलं मत व्यक्त करताना म्हणाला, ”चेंडू चमकवण्यासाठी थुंकीचा वापर करणे कोरोनामुळं आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते, या संदर्भात गेल्या महिन्यापासून या गोष्टीवर आयसीसी बंदी घालेल अशी आशा व्यक्त केली जात आहे,” असे कुंबळे म्हणाला.
दरम्यान, चेंडूला थुंक लावण्यावर बंदी घालण्याच्या शिफारशीला मायकल होल्डिंग आणि वकार युनिस सारख्या माजी जलद गोलंदाजांनी विरोध केला, तर काहींनी त्याचे समर्थन केले आहे. आता समितीने केलेल्या शिफारसी मंजूरीसाठी आयसीसीच्या बोर्डासमोर ठेवल्या जातील. विशेष म्हणजे चेंडूवर जर थुंकी लावण्यास बंदी घातली तर क्रिकेटमध्ये एका नव्या युगाची सुरूवात होईल, असे बोलले जाते. अर्थात यामुळे चेंडू आणि बॅट यांच्यातील लढत कशी होईल हे येणारा काळच सांगू शकेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”