काबुल । तालिबानने अफगाणिस्तानवर भलेही ताबा मिळवला असेल मात्र आतापर्यंत त्यांना सरकार बनवता आलेले नाही. सरकार स्थापनेसाठी तालिबानमध्ये संघर्ष सुरू आहे. अफगाणिस्तानच्या ‘पंजशीर ऑब्झर्व्हर’ या वृत्तपत्राच्या रिपोर्ट नुसार, तालिबान आणि हक्कानी नेटवर्क सत्तेसाठी समोरासमोर उभे थकले आहेत. या दोन गटांमध्ये गोळीबार झाला आहे. अशाच एका घटनेत तालिबानचे सहसंस्थापक मुल्ला बरादर जखमी झाले. मात्र, सत्तेसाठी रक्तरंजित संघर्षाची पुष्टी नाही.
रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, बरादरवर आता पाकिस्तानात उपचार सुरू आहेत. यामुळे सरकार स्थापनेची घोषणाही पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी अशा बातम्या आल्या होत्या की, तालिबान सरकारचे नेतृत्व बरादर यांच्या हातात असेल.
मुल्ला बरादर यांनी सर्व पक्षांचा समावेश करून सरकार बनवावे अशी त्यांची इच्छा आहे, परंतु हक्कानी नेटवर्क अशा कोणत्याही भागीदारीच्या विरोधात आहे.
हक्कानी आणि सिराजुद्दीनच्या नेतृत्वाखालील त्याच्या दहशतवादी गटाला कोणाबरोबरही सत्ता सामायिक करायची नाही. असे म्हटले जात आहे की, हक्कानीला पाकिस्तानचा छुपा पाठिंबा आहे. हक्कानी इस्लामिक नियमांवर आधारित शुद्ध तालिबान सरकारच्या बाजूने आहेत.
तालिबान आणि मुल्ला बरादर यांच्यासाठी हे कठीण आहे, कारण त्यांनी दोहामध्ये ज्या देशांशी चर्चा केली आहे त्या सर्व देशांना सांगण्यात आले आहे की, ते सर्व पक्षांना सामील करून सरकार बनवतील.
तालिबान सरकारमध्ये महत्त्वाची पदे हक्कानी नेटवर्कला द्यावीत अशी पाकिस्तानची इच्छा आहे, असा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. याद्वारे त्यांना अफगाणिस्तानचे सैन्य नव्याने उभे करायचे आहे. एका न्यूजच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, फैजच्या काबूलमध्ये येण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे त्याला क्वेट्टा शूराचा मुल्ला याकूब, मुल्ला अब्दुल गनी बरादर आणि हक्कानी नेटवर्कमधील मतभेद संपवायचे आहेत.
गेल्या 20 वर्षांपासून सुरु असलेले अफगाणी युद्ध संपवून अमेरिकेने आपले सैन्य मागे घेतले आहे. 15 ऑगस्ट रोजी तालिबानने एका ऑपरेशनद्वारे काबूलमध्ये प्रवेश करून देश ताब्यात घेतला आणि त्याच दिवशी अफगाणिस्तानचे सरकार पडले. राष्ट्रपती अशरफ घनी यांनीही देश सोडून पळ काढला. चीन, पाकिस्तान आणि रशियासारख्या देशांनी अशी विधाने जारी केली आहेत की ते तालिबानच्या येण्याने आनंदी झाले आहेत.