कोरोनाच्या भीषण परिस्थितीमुळे हायकोर्टाने सामूहिक नमाज पठणाची परवानगी नाकारली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुस्लिमांचा रमजान महिना आजपासून सुरू होत असल्याने दक्षिण मुंबईतील मशिदीत दिवसातून पाच वेळा केवळ ५० जणांच्या उपस्थितीत नमाझ होण्यासाठी परवानगी देण्याची जुमा मस्जिद ट्रस्टची विनंती मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. करोनाची सध्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेता अशी परवानगी देण्यात येऊ शकत नाही, असा तीव्र विरोध दर्शवत तातडीच्या याचिकेचा विचार करू नये, अशी विनंती राज्य सरकारतर्फे न्यायालयाला करण्यात आली. यानंतर राज्य सरकारचे नियम कायम राखत कोर्टाने ही परवानगी नाकारली.

‘सध्याची करोनाच्या वाढत्या संसर्गाची परिस्थिती भीषण आहे. म्हणूनच राज्य सरकारने कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे आणि ब्रेक दी चेन अंतर्गत प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांचे आरोग्य हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा संवेदनशील आणि खडतर परिस्थितीत याचिकादारांना सामूहिक नमाझ पठणचे आयोजन करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही’, असं न्यायमूर्ती आर. डी. धनुका आणि न्यायमूर्ती व्ही. जी. बिश्ट यांच्या खंडपीठाने अंतरिम आदेशात स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांन गुढीपाडव्याच्या दिवशी राज्यातील जनतेशी संवाद साधत कडक निर्बंधांची घोषणा केली. राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत करोनाची साखळी तोडण्यासाठी पुढील १५ दिवस कलम १४४ लागू करत संचारबंदी केली आहे. यामुळे अनावश्यक गर्दी कमी होण्यास मदत होईल. या लॉकडाऊनच्या काळात केवळ आवश्यक सेवा सुविधाच सुरू राहतील. सर्व प्रकारची वाहतूकही सुरूच राहणार आहे तसेच आर्थिक दुर्बल घटकांना देखील त्यांना त्रास होणार नाही यासाठी चांगले आर्थिक सहाय्य देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Leave a Comment