Tuesday, June 6, 2023

काय सांगता! वाळू चोरीत सापडलेल्या डंपर चालकाने पोलिस स्थानाकातूनच केले डंपर घेऊन पलायन

म्हसवड : माण तालुक्यात सुरु असलेल्या वाळू चोरीस लगाम घालण्यासाठी माण महसुल विभागाने नेमलेल्या भरारी पथकाने पकडलेला डंपर म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आल्यावर संबंधित डंपर चालकाने तो डंपर पोलीस स्टेशनच्या पाठीमागे लावण्याच्या बहाण्याने डंपरसह पलायन केल्याचा थक्कादायक प्रकार म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये घडला. याबाबतची फिर्याद माण महसुलचे कर्मचारी युवराज भिमराव खाडे यांनी म्हसवड पोलीस स्टेशनला दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, मी युवराज भिमराव खाडे (वय 34, धंदा नोकरी (महसुल सहाय्यक माण तहसिल कार्यालय) रा. ढाकणी ता. माण जि. सातारा.समक्ष म्हसवड पोलीस ठाण्यात हजर राहुन लिहुन देतो खबरी जबाब की मी वरील ठिकाणचा कायमचा राहणारा असुन मी तीन महिन्यापासुन माण तहसिल कार्यालय येथे महसुल सहाय्यक म्हणुन कामकाज पाहत आहे. 4 नोव्हेंबरला सकाळी साडेसहाच्या सुमारास मी व निवासी नायब तहसिलदार आर. ए. जाधव, उपविभागीय अधिकारी माण खटाव यांचेकडील आदेश क्रमांक – गौख / कावी 825/2021 दिनांक – 30/09/2021 नुसार अवैध गौण खनिज उत्खन्न वाहतुक रोखने कामी भरारी पथकाच्या आदेशानुसार गस्त घालत असताना मायणी म्हसवड रोडवर दिडवाघवाडी ता माण गावचे हद्दीत वाळुने भरलेला पिवळ्या रंगाचा नंबर प्लेट नसलेला टिपर (डंपर) समोरुन येताना दिसला.

त्यावेळी आम्हाला त्यामध्ये चोरटी वाळु असल्याचा संशय आल्याने आम्ही त्यास थांबवुन खात्री केली असता आम्हाला त्यामध्ये अंदाजे तीन ब्रास वाळु दिसुन आली म्हणुन आम्ही टिपर चालक यास खाली उतरुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव- संतोष ढेंबरे (रा. दिडवाघवाडी ता. माण) सांगुन वाळु वाहतुकीबाबत परवान्याबाबत विचारले असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले. त्यानंतर सदरचे वाहन म्हसवड पोलीस ठाणेस घेवुन चल असे म्हणाले.