भरदिवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून पळविले, परिसरात उडाली खळबळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगलीतल्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवर असणाऱ्या गारपीर चौक येथे भरदिवसा चेन स्नॅचिंगची घटना घडली. घरी चालत निघालेल्या महिलेच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केले. सदरची घटना हि शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सुधाराणी रणजित शिंदे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सुधाराणी शिंदे या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास त्या घरी निघाल्या होत्या. गारपीर चौक येथे आल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल ते 100 फुटी रोड ओलांडताना दुचाकीवरून अज्ञात दोघेजण पाठीमागून आले. त्यांनी शिंदे यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे आणि 30 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसडा मारून धूम स्टाईल ने पोबारा केला.

अचानक घडलेल्या या प्रकारानंतर शिंदे गोंधळल्या त्यांनी आरडाओरडा केला असता परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. तोपर्यंत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. परिसरात असणाऱ्या सीसीटीव्ही मध्ये चोरटे कैद झाले असून त्यांना शोधण्याचे काम पोलीस करत आहेत. दरम्यान, अतिशय मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा चोरट्यांनी चेन स्नॅचिंग केल्याने खळबळ उडाली आहे.