हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ईडीच्या वतीने ठिकठिकाणी छापेमारी केली जात आहे. अनेक बढया नेत्यांच्या घरावर धाडी टाकून संपत्ती जप्त केली जात आहे. नुकतेच पिंपरी चिंचवड येथील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्यावर कारवाई केल्यानंतर ईडीकडून आणखी एक कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीराव भोसले बँकेतील 71 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार अनिल भोसले यांची 26 कोटी 26 लाखांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बँकेतील 71 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणात अनिल भोसले यांना मागील वर्षी मार्च महिन्यात अटक झाली होती. यावेळी भोसले यांच्यासह सूर्याजी पांडुरंग जाधव, नूसर शनूर मुजावर यांच्यासह अन्य आरोपींवर यापुर्वीच गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने भोसले यांच्या मालमत्तेवर टाच आणली होती.
आता ईडीनेही अनिल भोसले यांची पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 26 कोटी 60 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. भोसले यांनी बनावट कर्ज प्रकरणे मंजूर केली होती. त्यामाध्यमातून ठेवीदारांचे पैसे त्यांनी अन्यत्र वळवले होते. यामुळे बँक अडचणीत आली आहे.